B. Com Part II मराठी उत्तरपत्रिका 2019 SGBAU


B. Com Part II मराठी उत्तरपत्रिका 2019 SGBAU


Click Here For Question Paper 

1. अदभुतरम्य आणि स्फूर्तिदायक जीवन या पाठाच्या आधारे डॉ. पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा आढावा घ्या.

उत्तर :- डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन हे समर्पित जीवन आहे आणि म्हणूनच ते आदर्श जीवन आहे, स्फूर्तिदायक जीवन आहे. त्यांच्या जीवनाला ध्यास शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा आहे आणि त्याच दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीच त्यांनी अधिकाराचा सद्उपयोग केला. जेथे हक्क नसेल तेथे त्यांनी अधिकारपदाचा लोभ सोडून ते शेतकऱ्यांमध्ये येऊन मिसळलेले आहेत.


डॉ. पंजाबरावांनी आपल्या कार्याला सुरुवात केली त्यावेळी त्यांना काय आढळले? तर त्यांना विदर्भाचा कष्टाळू शेतकरी दिसला. सूर्य वरून आग ओकतो आहे आणि विदर्भाचा शेतकरी शेतात नांगर चालवतो आहे. घामाने ओलाचिंब होऊन तो कष्ट उपसतो आहे. तो, त्याची बायको, मुलेबाळे देखील शेतात राबत असतात हे डॉ. पंजाबराव यांनी जवळून पाहाले आहे.

सर्वजण शेतात सदासर्वकाळ राबत असतात. हाडाची काडे करतात. ते सर्वांसाठी अन्नधान्य निर्माण करतात पण त्यांना स्वतःला मात्र पुरेपूर अन्न मिळत नाही. त्यांच्या शेतीसाठी पाण्याची सोय नाही, निवाऱ्याला पुरेशी जागा नाही. असा हा शेतकरी दुःख-दारिद्र्याने गांजलेला, कर्जाच्या डोंगराच्या भाराखाली वाकलेला, अज्ञानाच्या अंधःकारात लोळत पडलेला पंजाबरावांनी अनुभवला.

शेतकरी शेतात फक्त कष्ट उपसतो. त्याला समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. सावकार त्याचे शोषण करतो. नशीबाला दोष देत शेतकरी स्वतः निमूटपणे सहन करतो. शेतकऱ्यांची गरिबी, शोषण, विषमता, अज्ञान पाहून डॉ. पंजाबरावांचे अंतःकरण पिळवटून निघाले. शेतकन्यांची पिळवणूक पाहून डॉ. पंजाबरावांचे हृदय तुटले, ते ढवळून निघाले कारण ते त्याच शेतीच्या मातीतून जन्माला आले होते. मातीने मातीचे हृदय ओळखले होते. त्याच मातीचे सामर्थ्यही त्यांनी ओळखले होते म्हणून डॉ. पंजाबरावांनी शेतकऱ्याचे दुःख दारिद्र्य नाहिसे करण्यासाठी शेतकरी प्रथम शिक्षित झाला पाहिजे हे ओळखले. शेतकऱ्यांना स्वतःच्या परिस्थितीची आणि सामर्थ्याची जाणीव पाहिजे, आत्मा जागृत पाहिजे हे डॉ. पंजाबरावांनी ओळखले.


शेतकऱ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. त्याची शिक्षणाकडे प्रवृत्ती नसेल तर ती निर्माण केली पाहिजे, सोयी नसतील तर त्या करून दिल्या पाहिजेत हे डॉ. पंजाबरावांच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी याच दृष्टीने आरंभीची पावले टाकली. डॉ. पंजाबरावांनी अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देता याव्या म्हणून शिक्षण कर वाढविला. त्यापूर्वी खेड्यापाड्यातून दौरे काढून शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांची मने वळविली. अमरावती येथे स्थापन झालेल्या शिवाजी हायस्कूलमध्ये नवीन चैतन्य निर्माण केले, त्यांनी स्वतः तेथे शिक्षण दिले.

डॉ. पंजाबरावांनी शेतकऱ्यांनी संघटना करण्यासाठी 'शेतकरी संघ' स्थापन केला आणि स्याला पोषक अशा अनेक चळवळी उभ्या केल्या. त्यांनी त्या काळात स्थापन केलेले. 'श्रद्धानंद' छात्रालय हे डॉ. पंजाबराव यांच्या शैक्षणिक व सामाजिक व्यापक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत प्रतीक होय. डॉ. पंजाबरावांनी बहुजन समाजातील गोरगरीब विद्याथ्र्यांसाठी अत्यंत कमी खर्चात छात्रालयाची सोय करून मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठा व सामाजिक समतेचे बीजारोपण केले. सर्व धर्माच्या आणि सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीच बंधने नव्हती.

2. गाडगेबाबांच्या विचाराचा वेध विट्ठल वाघ कशाप्रकारे घेतात ते लिहा.

उत्तर : डॉ. विठ्ठल वाघ यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर 'डेबू' ही कादंबरी लिहिली. त्यांनी २० वर्षे आधी गाडगेबाबांच्या जीवनावर जो चित्रपट काढला होता त्या चित्रपटाची कथा-पटकथा विठ्ठल वाघांनी लिहिली होती. त्या चित्रपटात गाडगेबाबांचे बालपण फारसे दाखविण्यात आले नव्हते. त्यामुळे विठ्ठल वाघ यांनी 'डेबू' ही कादंबरी लिहिली.


डेबूचा जन्म ज्या घरात, कुळात, ज्या जातीत, ज्या विभागात झाला त्यातील प्रथा आणि रूढी विठ्ठल वाघ लक्षात आणून देतात. लोकांचे कमालीचे अज्ञान होते. अडाणीपण वाढले होते.. अंधश्रद्धा, देवभोळेपणा, धर्मखुळेपणा, व्यसनाधीनता प्रचंड प्रमाणात वाढली होती. ज्यांच्याकडे थोडीफार शेती होती त्यांच्यावर कर्ज वाढले होते. एकंदरीत आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. दुसऱ्या बाजूला लोक मूल झाल्याचा आनंद असो की बाप मेल्याचे दुःख असो, लग्न सोहळा असो की धार्मिक विधी-उत्सव असो, अशा प्रसंगी पूजा अर्चा करीत. कोंबडे बकरे - कापत. दारु पिऊन धिंगाणा करत. हा रूढी-परंपरेचा अपरिहार्य भाग म्हणून ते करत. डेबूचे वडील झिंगराजी जाणोरकर हे व्यसनापायी उध्वस्त झाले. त्यांची शेतीवाडी गेली. डेबूच्या मामाकडे शेती होती. पण खोट्या प्रतिष्ठेपायी त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. हे सारे लहानपणापासून डेबू पाहत होता. त्यावेळी तो विचार करीत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करीत होता.

डेबूचा वंक्या हा जिवलग मित्र होता. वंक्या महारवाड्यातला पोरगा होता पण त्याची व डेबूची जिवाभावाची मैत्री होती. एखादं कवठ सापडलं तर ते दोघं वाटून चिंचा, बोरं, आंबे, जांभळं ते दोघं मिळून खायचे. वंक्या जेव्हा शिदोरी सोडायचा त्यात कधी भाकर असायची तर चटणी नसायची. चटणी नसायची तर कांदा असायचा. ते पाहून तो हळहळायचा- डेबू म्हणायचा. "हे भाजी घे, रायतं त तुले आवळतेच. हं हे घे." असे ते दोघं एकमेकांत गुंतलेले होते. डॉ. विठ्ठल वाघ वावरात पसरलेल्या वासनच्या वेलाचे उदाहरण देतात. ते म्हणतात, “वासनचे वेल जसे दूर दूर खपखप वाढत जातात. एक दुसऱ्याला कवटाळीतच वाढतात. वेगळे काढतो म्हटलं तर निघायचे नाहीत. तुटतात पण सुटत नाहीत." अशी त्या दोघांची अतुट मैत्री होती. एक अनामिक नातं होतं.


डेबू आणि वंक्या यांची अतुट मैत्री पाहून गावभर चर्चेचा विषय व्हायचा. पाण्यात काठी मारली तर पाणी वेगळे व्हायचे नाही अशी ही मैत्री होती. डेबूच्या आईने डेबूला सांगितलेले असते. "म्हारामांगात खेयत नको जाऊ. त्याईच्या संग खातपेत नको जाऊ. बाट होते." डेबूला मात्र बाटण्याबद्दल काही कळत नाही. एकदा डेबूने वंक्याला प्यायचं पाणी दिलं. डेबूच्या आईने ते पाहिलं. तिने डेबूचं बखोटं धरून त्याच्या पाठीवर ढोल बडवणे सुरू होते. तुराटीच्या काडीने ती मारहाण करते. तोंडाचा पट्टा सुरू होतो - "मसन्यावानाचा जात पायेत नाही, पात पायेत नायेत बाटोली मायी थाली..." डेबूच्या मनात मात्र 'असं कसं?' हा प्रश्न निर्माण होतो.

आपली आई का बरे इतकी भडकली ? थाली बाटोली म्हणजे काय ? घागर फुटली तर ते आपल्याला कळते पण थाली बाटली ते कळत नाही. डोळ्यांना दिसत नाही. मग आईलाच कसं दिसते ? कसं कळते ? असे सारे प्रश्न डेबूला पडतात, असे प्रश्न सामान्य माणसांना पडत नाहीत. कोंबडे-बकरे का कापतात ? देवीला नवस का करतात? हे प्रश्न सामान्य माणसाला पडत नाही. या प्रश्नासंदर्भात संशय देखील कधी येत नाही आणि कुणी तसा व्यक्त केला तर तो समाजाच्या रूढीच्या मान्यतेविरुद्ध ठरतो. समाजाला तोंड देण्याची कुवत नसते. म्हणून सामान्य माणूस मूक राहतो. रूढी परंपरांना विरोध करणारा चिडलेल्या, संतापलेल्या समाजाला तोंड देणारा, परंपरागत गोष्टींना विरोध करणारा हा सामान्याहून वेगळा असामान्य ठरतो. संत गाडगेबाबा हे सामान्यांहून वेगळे असल्यामुळे ते असामान्य पुरुष ठरतात असे डॉ. विठ्ठलवाघ म्हणतात.

3. खालील विभागापैकी कोणताही एक विभाग सोडवा.

1. सोहळा या कवितेचे रसग्रहण करा.

उत्तर : प्रा. मधुकर केचे 'सोहळा' ही कविता अभंगाच्या स्वरूपात ही कविता त्यांच्या 'पुनवेचा थेंब' या काव्यसंग्रहातून घेतली आहे. आधुनिक मराठी कालखंडात प्राचीन काळातील अभंग नव्या रूपात मांडणारे मधुकर केचे हे पहिले कवी आहेत. अभंग हा प्रकार त्यांनी अतिशय यशस्वीपणे हाताळलेला आहे.


'सोहळा' या कवितेत कवी मधुकर केचे यांनी भक्तीच्या क्षेत्रातही होणाऱ्या दुजाभावाविषयीचे मार्मिक विवेचन केले आहे. भक्तीच्या क्षेत्रात विविध पंथ-संप्रदाय आहेत. प्रत्येकाचे आचरण भिन्न आहे. प्रत्येकाचे दैवत भिन्न आहे. झेंडा वेगळा, कपाळावरचा टिळाही वेगळा आहे. आपलाच पंथ कसा श्रेष्ठ आहे? हे प्रत्येकजण सांगण्याचा प्रयत्न करतो. श्रेयवादासाठी त्यांच्यात वादविवाद तंटे-भांडणे निर्माण होतात. कवी म्हणतात-


"अवघ्या पंथांनी उगारलेल्या झेंड्या

देऊन गचांड्या दूर केले. "


जे, जे पंथ-संप्रदाय आहेत, त्या-त्या पंथाचे अध्वर्यू, त्यांचे सहकारी आपल्याच पंथांच्या वर्चस्वासाठी आपलाच टेंभा मिरवीत असतात. त्यातून वितंडवाद होतो. झेंड्या उभारायच्या सोडून ते एकमेकांवर उगारू लागले आहेत. आपल्या विरोधकांना गचांड्या देऊन हाकलून लावत आहेत. भक्तीच्या क्षेत्रात नको तेवढा सावळागोंधळ वाढलेला आहे हे पाहून कवी व्यथित होतात.


कोणत्याही प्रसंगी कोणताही मेळा भरला तर तेथील उणिवा दाखविल्या जातात. स्वतःचा मोठेपणा मिरवला जातो. भक्तांच्या या मेळ्यात खऱ्या भक्ताची, भाविकांची अडचण होते. मग कोणता पंथ स्वीकारू असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून कवी म्हणतात की मी जिथून निघालो तिथेच उभा आहे.


"पुढल्या पताका गेल्या विखरुन समजेना कोण कुठे गेले "


विविध पंथांचे लोक हमरीतुमरीवर येतात. अगदी क्षुल्लक कारणांवरून त्यांचे मतभेद होतात. मग त्याला भांडणाचे स्वरूप येते. उभारलेल्या पताका विखरुन जातात, अस्ताव्यस्त होतात भांडणाऱ्या भाऊगर्दीत कोण कुठे केला हेच कळत नाही..


"पांगलेल्या वाटा

जेथे होती गोळा तेथचा सोहळा

पाहू दे गा'


पंथां-पंथामध्ये भांडणे-मारामाऱ्या होतात. भक्त वाट सापडेल तिकडे पळून जातात. आता रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. पांगलेल्या वाटा जिथे गोळा होतात तेथील सोहळा पाहण्याची कवी इच्छा व्यक्त करतात.



पंथभेद हा भक्तीच्या क्षेत्रात नसावा. कुठलेही बंधन नसावे. त्यात कृत्रिमपणा नसावा. भक्ताभक्तांमध्ये, झेंड्याच्या रंगामध्ये, कपाळावरच्या टिळ्यांमध्ये कुठलाही भेदभाव नसावा. कुणी कृष्ण मानतो, कुणी राम मानतो याचा कुणाला दुःस्वास वाटू नये. खऱ्या अर्थाने भक्तीचा सोहळा संपन्न व्हावा व भक्तजणांनी भक्तीच्या नामस्मरणात रंगून जावे असे कवीला वाटते. अशाप्रकारे अल्पाक्षरी अभंगातही कवी फार मोठा आशय सांगून जातो.

2. हमीभाव वाहून गेला या कवितेची व्यथा तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

उत्तर : विठ्ठल कुलट हे ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण रेखाटणारे कवी आहेत. त्यांची 'हमीभाव वाहून गेला' ही शेतकऱ्यांचे दुःख प्रकट करणारी कविता आहे. शेतकरी शेतात राबतो, घाम गाळतो पण त्याने पिकवलेल्या कापसाला भाव मिळत नाही. उत्पन्न आले की तो नाना कल्पनांचे मनोरथ उभारतो. शेवटी मात्र त्याचा अपेक्षाभंग होतो. त्याच्या मालाला भाव मिळत नाही.


"कापसाच्या भावासाठी

जीव पहाटीचा तुटे

सोयाबीनचे हाल पाहून

तुरीचाही कंठ दाटे"


शेतकऱ्याने कापूस पिकवला. बाजारात मात्र कापसाला भाव नसतो. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कापसाला भाव मिळत नाही. हे पाहून पऱ्हाटीचा जीव तुटतो. सोयाबीनचे हाल पाहून तुरीचा कंठ दाटून येतो. वावरातील उडीद, मुगाचीही परिस्थिती वाईट असते. पाऊस न आल्याने पिके करपून जातात. जमिनीला भेगा पडतात. उडीद, मुगाचे हाल पाहून बरबटीच्या डोळ्यात टचकन पाणी येते.

"रब्बीतला हरभरा अजून

अजाण आहे तान्हा

थकलेली माती त्याला"



पुरवते आटलेला पान्हा. रब्बी हंगामातला हरभरा अजून लहान आहे, अजाण आहे, तान्हा आहे, त्याची नीट वाढ झाली पाहिजे, त्याचे संगोपन झाले पाहिजे, त्याचे भरणपोषण झाले पाहिजे म्हणून थकलेली असून सुद्धा माती आपला आटलेला पान्हा हरभऱ्याला पुरविते आहे. हे मातीचं मोठेपण कवीने अतिशय उत्कटतेने चित्रित केले आहे.


शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय चिंताग्रस्त झाली आहे. त्याला कुणाचा आधार नाही. मग तो पंढरीच्या विठ्ठलाकडे जाऊन साकडे घालतो. आपला आराध्यदैवत तरी आपल्या पाठीशी उभा राहील अशी त्याची भोळी आशा असते. पण काळा ढग त्याला प्रसन्न होत नाही. पाऊस पडत नाही. तो चिंतातूर होतो. त्याची आजपर्यंतची पुण्याई कामी येत नाही. पण जे चतुर लोक आहेत हुशार अति धूर्त लोक आहेत त्यांचे पाप मात्र फळाला येते. पुण्याईचा पराभव अन् पापाचा विजय होतो. बिचारा शेतकरी मात्र रात्रंदिन कष्ट करूनही अर्धपोटी राहतो.

"मातीतील पिकं यंदा

मातीलाच धरून रडतात

राजधानीतील राजे गा

नसतं चित्र पाहतात. "


शेतकरी मोठ्या आशेने पेरणी करतो. उत्पन्न आले की तो नवनवी स्वप्ने पाहतो पण त्याची स्वप्ने पूर्ण होत नाही, पिके बहरून येतात पण पावसाअभावी ती करपून जातात. मातीतील पिकं मातीलाच धरून रडतात. शेतकऱ्यांची अशी दुरावस्था होताना मात्र राजधानीतील राजे नुसतं चित्र पाहतात. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडातील घास निसर्गाने हिरावून नेलेला असताना नेते मात्र गप्प असतात. ते शेतकऱ्यांना कुठलीही मदत करीत नाहीत, देखावा मात्र अवश्य करतात. बळीराजाचे दुःख कोणी समजून घेत नाहीत.


शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. सरकार केव्हातरी जागे आल्यावर घोषणा करते पण त्या घोषणांचा, आश्वासनांचा शेतकऱ्याला काही उपयोग होत नाही. त्या घोषणा हवेतच विरून जातात. घोषणांच्या महापुरात हमीभाव वाहून जातो. पन्हाटीचा कापूस पांढरं सोन असूनही भंगाराच्या भावात शेतकऱ्याला विकावा लागतो. त्याच्याशिवाय त्याला पर्याय नसतो.

अशाप्रकारे विठ्ठल कुलट यांनी शेतकऱ्यांचे दुःख 'हमीभाव वाहून गेला' या कवितेत मांडले आहे. या कवितेतील उत्कृष्ट कल्पना आणि प्रतिमा यांचा उत्तम समन्वय कवीने साधला आहे. कापसाच्या भावासाठी पन्हाटीचा जीव तुटणे, सोयाबीनचे हाल पाहून तुरीचा कंठ दाटून येणे, उडीद, मुगाचे अशुभ वावरातील पडलेल्या भेगांनी पाहणे, बरबटीच्या डोळ्यांत टचकन पाणी येणे, अजाण तान्हा असलेला हरभरा, थकलेली माती, पिकांचे मातीला घरून रडणे, घोषणांच्या पुरात हमीभाव वाहून जाणे इत्यादी कल्पना आणि प्रतिमा यामुळे ही कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करून जाते.


4. खालील विभागपैकी कोणताही एक विभाग पूर्णपणे सोडवा


1. स्वपरिचय पत्रातील बलस्थान यांची माहिती लिहा.

रेझ्युमेला मराठीत स्व-परिचयपत्र असे म्हणतात. इंग्रजीत बायोडेटा किंवा सी. व्ही. (Curriculam Vitae) म्हणतात. 'फर्स्ट इंप्रेशन' हे व्यावहारिक जगात महत्त्वाचे आहे. कुठेही नोकरीसाठी, बढतीसाठी संधी उपलब्ध होण्याची पहिली पायरी म्हणजे स्व-परिचयपत्र होय.

रेझ्युमे ही उमेदवाराची पहिली मुलाखत असते. मुलाखतीमध्ये संबंधित अधिकाऱ्याची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वी आधी तुमचा रेझ्युमे पोहोचत असतो. निवड अधिकाऱ्याचे तुमचे रेझ्युमे वाचून तुमच्याबद्दल प्राथमिक स्वरूपाचे मत त्या रेझ्युमेमुळे तयार होते. तुमचा रेझ्युमे चांगला असेल तर तुम्हाला मुलाखतीला बोलावणे येईल. करियरच्या कोणत्याही टप्प्याला तुमचा रेझ्युमे अद्ययावत आणि चपखल असायला पाहिजे.


रेझ्युमेला नगण्य स्थान दिले तर मुलाखतीचे निमंत्रण येत नाही. वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर आपला रेझ्युमे नीट करणे आवश्यक आहे.


रेझ्युमे लिहिताना त्याचे तंत्र आणि मंत्र जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रेझ्युमे लेखनाचे तीन मंत्र आहेत. त्यातील पहिला मंत्र म्हणजे स्वतःची बलस्थाने ओळखून रेझ्युमे तयार करायचा आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला टिकून राहायचे असेल तर तुम्ही नुसते गुणवंत राहून चालणार नाही. तुम्ही गुणवंत आहात हे समोरच्याला जाणवून द्यायला हवे. त्यासाठी तुम्हाला तुमची बलस्थाने नेमकी ओळखता आली पाहिजे. अशी बलस्थाने प्रत्येकाकडेच असतात पण ज्याचा शोध ज्याचा त्याने घेतला पाहिजे.


या संदर्भात डॉ. भूषण केळकर यांनी टूथपेस्टचे उदाहरण दिले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे टूथपेस्ट बाजारात उपलब्ध असतात पण प्रत्येक उत्पादनाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य असते. ते वेगळेपण (Unique Selling Point-USP) जाहिरातीत उठावदारपणे समोर आणले जाते तसेच व्यक्तीबाबतही आहे. नोकरीच्या स्पर्धेत तुमच्यासारखेच गुणवत्तेचे, शैक्षणिक पात्रतेचे हजारो उमेदवार स्पर्धक म्हणून उभे असतात. यावेळी तुम्ही तुमचे नेमके वेगळेपण कोणते ? ते ओळखून रेझ्युमेमध्ये मांडणे आवश्यक आहे. हे वेगळेपण कोणत्या शैलीत व्यक्त करता, यावरही ते अवलंबून आहे.



2. मनीषा देठे यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी केलेल्या अर्जाचा स्वपरिचय पत्राचा नमुना लिहा.

मनिषा देठे

वकिल लाईन, चांदूर रेल्वे

जि. अमरावती ४४४६५

xyz@gmail.com संपर्क- 1234567890


उद्दिष्टे : १) विद्याथ्र्यांमध्ये इतिहास विषयात गोडी निर्माण करणे.

            २) प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन विद्याथ्यांमध्ये भारतीय इतिहासाबद्दल प्रेम निर्माण करणे.

 

सारांश:.  १) इतिहाससंबंधी विविध नियतकालिकांतून लेखन. भारत इतिहास संशोधन पत्रिकेत शोधनिबंध लेखन.

            2) इतिहास विषयासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, व्याख्याता म्हणून सहभाग


व्यावसायिक पात्रता :१) महिला महाविद्यालय, चांदूर रेल्वे येथे २०१३ पासून C.H.B. तत्त्वावर कार्यरत.

                            २) विदर्भस्तरीय इतिहास प्राध्यापक परिषदेत सक्रीय सहभाग. 

शैक्षणिक पात्रता: 1) एम. ए. इतिहास, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती 201l

                        २) एम. फील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ नागपूर २०१२

                        ३) पीएच.डी साठी नोंदणी २०१५


 अभ्यासेत्तर उपक्रम : १) प्राचीन नाणी संकलन

                             २) इतिहासविषयक परिसंवाद, चर्चा या उपक्रमात सहभाग


पुरस्कार व पारितोषिके: १) एम.ए. ला इतिहास विषयात संत गाडगेबाबा  अमरावती विद्यापीठाचे सुवर्णपदक

                                   २) एम. फील. चा उत्कृष्ट लघुप्रबंध लेखनासाठी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरस्कार



5. अ) योग्य पर्याय निवडा.

1. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणती शिक्षण संस्था स्थापन केली ?

उत्तर :- शिवाजी शिक्षण संस्था 


2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता ?

उत्तर :- ग्रामगीता 


3. स्टीव्ह जॉब्स यांनी 2005 साली कोणत्या विद्यापीठात भाषण केले ?

उत्तर :-  स्टॅनफोर्ड विद्यापीठ 


4. नरेंद्र इंगळे यांची कथा कोणत्या कथासंग्रहातील आहे. ?

उत्तर :- तितंबा 

5. ब) योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा.

1) वादळातल्या प्रवासात हा कवितासंग्रह कोणाचा आहे ?

उत्तर :-  अशोक थोरात


2. मोडलेल्या माणसांचे................ ओले झेलताना.

उत्तर :-  दुःख


3. स्वपरिचय पत्रात तुमची............ वैयक्तिक माहिती नसावी.

उत्तर :- स्तुतीपर


4. आजच्या स्पर्धेच्या युगात बहु आयामी उमेदवाराची निवड करण्याकडे संस्थेचा................... असतो.

उत्तर :- कल 



Post a Comment

1 Comments